लोकमान्य टिळक यांची माहिती । Lokmanya Tilak Information in Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हे वाक्य कानी पड़ताच प्रथम चेहरा डोळ्यासमोर येतो तो लोकमान्य टिळक (Lokamanya Tilak) यांचा. टिळक हे भारतीय इतिहासातील एक मोठं नाव. आज या लेख मध्ये आपण लोकमान्य टिळक यांची माहिती (Lokmanya Tilak Information in Marathi) पाहणार आहोत.

नाव बाल असल तरी कर्तृत्व मात्र ब्रिटिशांना धड़की भरवणार होत. टिळकांचं नाव समोर येताच “लोकमान्य” किंवा “हिंदू राष्ट्रवादाचे जनक” ह्या त्यांना मिळालेल्या उपाधी आपल्या मुखी येणं साहजिक आहे. त्यांनी समाजाच्या एकोप्यासाठी केलेलं कार्य आणि स्वातंत्र्यासंग्रमात ब्रिटिशां विरुद्ध दिलेला त्यांचा लढा कायमच भारतीयांच्या मनामधे स्वातंत्र्याच प्रतीक बनून राहील आहे.

लोकमान्य टिळक यांची माहिती (Lokmanya Tilak Information in Marathi)

आज आपण या लेखात बाल गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक (Lokamanya Tilak) लोकमान्य टिळक यांची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला त्यांचा हा जीवन प्रवास नक्कीच जाणून घेतला पाहिजे.

आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याच महत्व आणि समाज एकवटिचा बोध आपल्याला नक्कीच त्यांच्या जीवनातून शिकायला मिळेल. तर हा लेख पूर्ण वाचा.

वैयक्तिक माहितीतपशील
संपूर्ण नावकेशव गंगाधर टिळक
जन्मदिन२३ जुलै १८५६
जन्मस्थानरत्नागिरी, महाराष्ट्र
वडीलांचे नावगंगाधर शास्त्री टिळक
आईचे नावपार्वतीबाई टिळक
पेशाशिक्षक, पत्रकार, राजनेता
शिक्षणबॅचलर ऑफ आर्ट्स, M.A., L.L.B
विवाहतापीबाई (सत्यभामाबाई)
वृत्तपत्रेकेसरी व मराठा
सुरू केलेले उत्सवगणेश उत्सव,छत्रपती शिवाजी महाराज जयंती
उपाधीलोकमान्य
मृत्यु1 ऑगस्ट 1920

जन्म आणि परिवार

लहानपणी घरामध्ये टिळकांना लाडाने “बाल” अस म्हणत पण त्यांचं वास्तविक नाव केशव (बाल) गंगाधर टिळक.

त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरीतल्या मधल्या आळीत कोकणातील दापोली तालुक्यातल्या चिखली या गावी झाला. कुटुंब मध्यमवर्गीय चित्पावन ब्राह्मण.

त्यांचे वडील गंगाधर शास्त्री टिळक हे पेशाने शिक्षक तसेच संस्कृतचे मोठे विद्वान होते.त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई टिळक होते.

लोकमान्य टिळकांच्या वयाच्या 10 व्या वर्षी त्यांच्या वडिलांची बदली पुण्यात झाली. पुण्यात आल्यावर थोड्याच दिवसात त्यांच्या आईचे निधन झाल आणि त्यांच्या 16 व्या वर्षी वडिलांचं देखील स्वर्गवास झाला.आई-वडिलांची छत्रछाया हरवलेल्या टिळकांचा सांभाळ त्यांचे काका गोविंद पंत यांनी केला.

वडील हयात असताना वयाच्या 16 व्या वर्षी सन 1871 मध्ये त्यांचा विवाह तापीबाई यांच्या सोबत झाला. विवाहा नंतर हिंदू धर्मामध्ये नाव बदलण्याची प्रथा आहे त्यानुसार तापीबाई ऐवजी सत्यभामाबाई असे नामकरण करण्यात आले.

शिक्षण

मी शेंगा खाल्या नाही मी टरफल उचलणार नाही” ही त्यांची शाळेतील शेंगाची गोष्ट तुम्हा सर्वाना परिचित असेल. लहानपणापासूनच अन्याय सहन न करण्याची वृत्ती त्यांच्या मध्ये निर्माण झाली होती.

वडील शिक्षक असल्यामुळे लहानपणीच त्यांना मराठी आणि संस्कृतच प्राथमिक शिक्षणाचे बाळकडू त्यांना घरातुनच प्राप्त झाले होते.या शिक्षणाचा त्यांच्या बौद्धिक विकासावर खूप मोठा परिणाम झाला. वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता यांसारख्या संस्कृत ग्रंथां मुले त्यांना भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीबद्दलची समज निर्माण झाली. भारतीय समाजामध्ये सांस्कृतिक अभिमान आणि राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी त्यांनी प्राचीन भारतीय ग्रंथांमधून प्रेरणा घेतली.

पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि 1872 मध्ये ते १० वी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्या काळातील ही सगळ्यात प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था होती. त्यानंतर 1876 मध्ये त्यांनी गणित विषयात प्रथम श्रेणीत बॅचलर ऑफ आर्ट्स मध्ये पदवी प्राप्त करत पुढे मास्टर ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला परंतु L.L.B च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मध्येच M.A. च शिक्षण सोडून L.L.B मध्ये प्रवेश घेतला. 1879 मध्ये त्यांनी L.L.B च शिक्षण पूर्ण करत गवर्नमेंट लॉ कॉलेज मधून पदवी प्राप्त केली.

पदवीधर झाल्यानंतर त्यांनी वडिलोपार्जित शेती करण्यास सुरुवात केली परंतु फक्त शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड होऊ लागलं म्हणून त्यांनी दर माह 5 रुपयाच्या पगारावर पुण्या मध्ये एका प्रायव्हेट कॉलेज मध्ये गणित शिकवण्यास सुरूवात केली परंतु नवीन कॉलेज मधील सहकार्यान सोबत वैचारिक मतभेदा मुळे माघार घेत पुढे त्यांनी पत्रकारिता करण्याचं ठरवल. आणि पुढे पत्रकरितामुळेच त्यांचा सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सहभाग वाढण्यास सुरुवात झाली.

न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना

डेक्कन कॉलेज मध्ये शिकत असताना त्यांची ओळख गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि महादेव बल्लाळ नामजोशी यांच्या सोबत झाली होती. हे तिघेही देशभक्त आणि स्वतंत्र प्रेमी. त्या काळात भारतावर ब्रिटिशांच राज्य होत ह्या परकीय सत्ते खाली पारतंत्र्यात जगणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या मनात देशाबद्दल प्रेम आणि स्वातंत्र्याची भावना निर्माण केली पाहिजे ह्या विचारावर एकमत होऊन त्यांनी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केली.

या मागील त्यांचं उद्दीष्ट होत भारतीय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देणं आणि या माध्यमातून त्यांच्या मनात राष्ट्रीयता ची भावना निर्माण करण.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना

त्यांनी चालू केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेला चांगला प्रतिसाद भेटल्यानंतर पुढे जाऊन त्यांनी 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या अतंर्गत 1885 साली त्यांनी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी फर्ग्युसन कॉलेजची देखील स्थापना केली.

ह्या कॉलेज चे नाव त्या काळचे मुंबई चे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. टिळक तिथे गणिताचे प्राध्यापक म्हणून देखील काम करत. परंतु काही कालावधीनंतर टिळकांनी या संस्थेतून राजीनामा दिला.

केसरी आणि मराठा वृत्तपत्राची सुरुवात

शाळेतील विद्यार्थ्यांपुरता आपले विचार मर्यादित न ठेवता सर्व समाजात आपले विचार पोहोचवले गेले पाहिजेत म्हणून त्यांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र चालू केले.

त्यांनी आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेबद्दल आपले विचार कठोरपणे मांडण्यास सुरुवात केली. ते वृत्तपत्राच्या माध्यमातून भारतीयांच्या मनात इंग्रजांच्या सत्ते बद्दल नेहमीच असंतोष निर्माण करत.म्हणून त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनकडून भारतीय असंतोषाचे जनक म्हणून देखील संबोधले गेले. इंग्रजांविरुद्ध त्यांच्या निर्भिय, सक्त आणि कठोर लेखणीमुळे ब्रिटिश सरकारला केसरी आणि मराठा वृत्तपत्रा बद्दल धाक निर्माण होऊ लागला.

त्यांच्या या लेखणीमुळे केसरी भारतभर प्रसिद्ध होऊ लागला होता. टिळकांनी आपल्या चाळीस वर्षांच्या संपादकीय कारकिर्दीत जवळजवळ 513 अग्रलेख लिहिले. त्यापैकी काही प्रमुख लेखांची नावे आम्ही खाली दिलेली आहेत.

  • सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय
  • उजाडले पण सूर्य कुठे आहे
  • टिळक सुटले पुढे काय
  • प्रिन्सिपॉल
  • शिशुपाल की पशुपाल
  • टोणग्याचे आचळ
  • हे आमचे गुरूच नव्हेत
  • बादशहाब्राह्मण झाले

टिळक फक्त उत्तम संपादक नसून गणित संस्कृत आणि खगोलशास्त्र याबद्दल देखील त्यांचा प्रचंड अभ्यास होता. त्यांच्या या सखोल अभ्यासामुळे त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत त्यांनी लिहिलेल्या काही प्रमुख पुस्तकांची नावे आम्ही खाली दिलेली आहेत.

  • ओरायन’(Orion)
  • आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas)
  • गीतारहस्य
  • टिळक पंचांग पद्धती.
  • टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.
  • वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष (Vedic Chronology and Vedang Jyotish)
  • Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित केले आहे.
  • The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).

टिळकांचा पहिला तुरुंगवास

टिळकांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून कोल्हापूर संस्थानाचे दिवाण माधवराव बर्वे आणि ब्रिटिश सरकार यांचा कट पहिल्यांदा लोकांसमोर उघडकीस आणताच माधवराव बर्वेंनी टिळकांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आणि टिळकांना पहिल्यांदा तुरुंगात जावं लागलं.

प्लेगची साथ

त्या काळात मुंबईमध्ये गाठीच्या प्लेगची मोठी साथ पसरली होती. हा रोग अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे 1897 येता येता हा रोग पुण्याच्या वेशीपर्यंत पोहोचला देखील.ह्या रोगाने पुण्यात थैमान घातल होत. या संसर्गजन्य रोगामध्ये टिळकांच्या मुलाचे देखील निधन झालं.

हा संसर्गजन्य रोग थांबवण्यासाठी रँड नावाच्या एका अधिकाऱ्याला नियुक्त करून ब्रिटिश सरकारने या रोगाला आवर घालण्याचा प्रयत्न सुरू केला. रँड च्या आदेशा नुसार त्याच्या अधिकाऱ्यांनी रोगग्रस्तांना वेगळे करण्यास सुरुवात केली परंतु या सगळ्यांमध्ये रँडच्या अधिकाऱ्यांकडून अनेक लोकांवर अत्याचार करण्यात आले. त्यांच्या या अत्याचारामुळे लोकांनी प्लेगपेक्षा रँड आणि ब्रिटिश सैन्यांचा जास्त धसका घेतला होता.

टिळकांनी प्लेग निरजंतुकीकरनाच्या या रँडच्या कार्यपद्धतीला विरोध करत त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका करणे सुरू केलं. 22 जून 1897 मध्ये मूजोर आणी माजोर झालेल्या रँड आणि त्याचा सहकारी आयरिस यांची चाफेकर बंधूंनी गोळ्या घालून हत्या केली.

टिळकांचा दुसरा तुरुंगवास

रँड ची हत्या होताच ब्रिटिश सरकारने चाफेकर बंधूंना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात आली. टिळकांना देखील या कटात सामील असल्याचे आरोप सरकारकडून लावण्यात आले.

या दरम्यान सरकारने केलेल्या आरोपांवर टिळकांनी आपल्या केसरी वृत्तपत्रातून “सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय?” आणि “राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे” असे दोन अग्रलेख सरकार विरोधात लिहिले.

या त्यांच्या दोन अग्रलेखा नंतर सरकारकडून त्यांना पुन्हा अटक करण्यात आले. त्यांच्या या अटकेनंतर ते लोकांमध्ये अजूनच प्रसिद्ध झाले आणि सरकारचा डाव उलटा पडला.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” असे ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणाऱ्या टिळकांमध्ये स्वराज्या बद्दलची निष्ठा साफ पणे दिसून येत होती.

आणि इथूनच लोकांनी त्यांना “लोकमान्य” म्हणजेच लोकांनी स्वीकारलेला नेता ही पदवी बहाल केली.

सार्वजनिक गणेश जयंती आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवांची सुरुवात

टिळक आपल्या वृत्तपत्रातून समाजाला एकत्रित करण्याचं काम तर करतच होते तसेच त्यांनी इ.स. १८९३ मध्ये सार्वजनिक गणेश जयंती आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती ची देखील सुरुवात केली.

समाजातील सगळ्या स्तरातील लोकांना राष्ट्राबद्दल प्रेम, ब्रिटिशांविरुद्ध उभे राहणे आणि स्वतंत्रतेची भावना निर्माण व्हावी हे यामागील त्यांचे उद्दिष्ट होतं.

राजकीय कारकीर्द

1990 साली टिळकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये पदार्पण केले. टिळक हे महात्मा गांधी पूर्वीचे सर्वात प्रसिद्ध राजकीय नेते होते.

त्या काळात राष्ट्रीय काँग्रेसचे मुख्यतः दोन गट होते मवाळ आणि जहाल. ही विभागणी खरे तर स्वदेशी चळवळीमुळे 1905 ते 1907 च्या दरम्यान झाली होती. टिळकांनी नेहमीच मावळ प्रवृत्तीचा काटेकोरपणे विरोध केला कारण इंग्रजांबरोबर जुळवून घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे मवाळ गटाचे धोरण होते. आणि या विपरीत जहालवादी गटाची विचारधारा म्हणजे इंग्रजांनी भारताला स्वतंत्र दिलेच पाहिजे आणि त्यासाठी कारवाया आणि आंदोलन करणे हे या गटाचे धोरण होते टिळक त्याकाळचे प्रसिद्ध जहालवादी नेत्यांपैकी एक होते.

टिळक राजकारणामध्ये सक्रिय असताना इसवीसन 1897 मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला होता. या कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांना एकत्रित करत त्यांना त्यांच्या हक्काबद्दल जागृत केले. आणि केसरीच्या माध्यमातून सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. त्या काळात ब्रिटिश सरकार लोकांकडून दुष्काळ विमा योजनाच्या अंतर्गत कर वसूल करत. टिळकांनी ब्रिटिश सरकारने केलेल्या कर वसुलीचा उपयोग दुष्काळामध्ये करावा असं सरकारला ठणकावून सांगितले.

तसेच सरकारच्या Famine Relief Code नुसार दुष्काळाच्या काळात कुठल्याही शेतकऱ्याला कसलाही कर देण्याची गरज नाही याबद्दल त्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना जागृत केले. कारण या दुष्काळाचा काळातही ब्रिटिश सरकार द्वारे काही भागांमध्ये कर वसुलीकरण चालू होतं.

लाल-बाल-पाल

तसेच, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या तिघांचेही राजकीय मते एकमेकांशी जुळत होते. पुढे लोक त्यांना लाल-बाल-पाल या त्रिकूटाने संबोधू लागले.

राजद्रोहाचा खटला

राजद्रोहाचा खटला मंडाले तुरुंगवास (लोकमान्य टिळक)

12 मे 1908 च्या केसरी मध्ये त्यांनी लिहिलेल्या “देशाचे दुर्दैव” या सरकार विरोधी अग्रलेखा मुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला आणि त्यांना भारताबाहेरील मंडालेचा तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा सुनावली.

तुरुंगवास भोगत असताना देखील तेथे त्यांनी कर्मावर आधारित गीता रहस्य लिहिलं आणि याच काळात त्यांची पत्नी सत्यभामाबाई यांचा देखील मृत्यू झाला. त्यांच्या तुरुंगवासामुळे त्यांच्या पत्नीच अंतिम दर्शन ही त्यांना घडू शकले नाही. परंतु त्यांनी हे दुःखही शांतपणे स्वीकारले.

मृत्यू

कितीही संकटे आली आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय रोवुन उभा राहील मी” असे ठणकावुन सांगणारे लोकमान्य अखेर आजारासमोर हरले. स्वराज्यासाठी केलेली अथक धडपड आणि उतार वयात त्यांना होत असलेल्या मधुमेहाचा त्रास आता सहन करण्याचा पलिकडचा होता . कोणतीही दवा कामी येत नव्हती. 1920 च्या जुलै महिन्यामध्ये त्यांना अचानक हिवतापाने घेरले आणि अखेर 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईत मध्ये ते अनंतात विलीन झाले.

त्यांच्या निधनाबद्दल आदरांजली वाहताना महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले होते.

नक्की वाचा

सारांश

आजच्या या लेखामध्ये आपण लोकमान्य टिळक यांची माहिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. टिळकांचा जीवनप्रवास एका लेखामध्ये मांडणे शक्य नाही ह्याची आम्हास कल्पना आहे.त्यांचा जीवनामधील काही ठराविक घटना आम्ही संक्षिप्त रूपात तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट द्वारा नक्की सांगा.तसेच या लेखात काही त्रुटि आढ़ळल्यास आम्हाला मेल द्वारा कळवू शकता आम्ही लेखामधील माहिती तपासून त्याला सुधारित करण्याचा प्रयत्न करू. लेख आवडल्यास शेयर करायला विसरू नका.

FAQ’s

  • लोकमान्य टिळक यांचे आईचे नाव काय होते?

    लोकमान्य टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई टिळक असे होते.

  • लोकमान्य टिळकांचे मूळ नाव काय होते?

    टिळकांचे मूळ नाव केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांचा कुटुंबात प्रेमाने त्यांना बाळ नावाने संबोधत.

Share Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *